मंगळवार, १८ जानेवारी, २०११

Update [Jan 18, 2011 1500 Hrs] Lokmat News Link:
http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=PuneEdition-4-1-18-01-2011-b2d03&ndate=2011-01-18&editionname=pune
Update [Jan 18, 2011 0900 Hrs] Sakal News Link:
http://www.esakal.com/esakal/20110118/5560500254762700661.htm


"श्री क्षेत्र रांजणी येथील नृसिंह आगमनाची कथा"
"पुंडलिक भेटी ..... परब्रह्म"


फार फार वर्षापूर्वीचा काळ. त्यावेळी सन समजायला भिंतीवर कॅलेंडरे नव्हती. गावाची आखणी झालेली नव्हती. वस्ती पांगलेली नव्हती. पाच ठिकाणी पाच मळे होते. मीनेच्या आश्रयाने खेडूत टिकून होते. सन समजायला मार्ग नव्हता. वर्षातून पाडव्याचे पंचांग वाचून दाखवायचं, सालाचं पाऊसपाणी समजून घ्यायचं, गेल्या वर्षीपेक्षा आवंदाचं साल जादा ताणाताणीचं अगर आमदानीचं एवढाचं अर्थ असायचा.

विखुरलेली वस्ती आनंदाने जगत होती. दिवस उगवल्यापासून मावळेपर्यंत कष्ट करायचे, अंधार झाला की वस्तीवर सामसूम व्हायची. चुली पेटलेल्या असायच्या. चुलीच्या प्रकाशात जेवणावळीपर्यंत गप्पागोष्टी करीत सारे आनंदात झोपायचे. पहाटेच्या पाखरांच्या किलबिलाटाने, सासुरवाशिणींच्या दळणाच्या गाण्यांनी, कोंबडयाच्या आरवण्याने सारी वस्ती जागी व्हायची. भूतकाळाची खंत नव्हती, भविष्याची चिंता नव्हती. पूर्णपणे "आजच्या घडीमध्ये" माणसं माणसारखी जगत होती.

लखू अण्णांचे घर माळवदी दोन खणींच होतं. सा-या वस्त्यांची अण्णांवर देवासारखी श्रध्दा. वर्षातल्या दहा सणांचं पंचांग अण्णांनी सांगितल्यावर वस्त्यांना सणांची चाहूल लागायची. दिवाळी असो वा गुढीपाडवा, अण्णांनी सा-या वस्तीवर हिंडून पंचांग सांगायचं, लोकांनी अण्णांचं कुंकू लावून स्वागत करायचं. हिंडता हिंडता कुंकवानी अण्णांचा मळवट भरला जायचा. वाटेत कोणी नावरस काढी, कोणी काल जन्म झालेल्या मुलाचे नावरशीचे नाव समजून घेई. अण्णांची फेरी म्हणजे लोकांना लिखाणातल्या ज्ञानाची मेजवानीच असायची.

सालामागून सालं चालली होती. अण्णा भिक्षुकी बरोबर दैवतांच्या पूजाअर्चेबद्दल फार जागरुक असत. आराध्य दैवत नरसिंहाची वैशाखाची वारी पायी पायी करीत. अण्णा नीरानरसिंहपुरच्या वारीला निघाले की सा-या वस्त्या एकत्र व्हायच्या. अण्णांच्या पायावर डोके ठेवून देवाला नमस्कार पाठवून द्यायच्या. दुस-या गावच्या शिवेपर्यंत अण्णांची मूर्ती दिसेनासी होईपर्यंत गावकारी थांबायचे. अण्णा मागे वळून पाहायचे आणि शांत मनाने प्रवास सुरु करायचे. मजल दरमजल करत नरसिंह जयंतीला नरसिंगपुरात पोहोचायचे.

अण्णांच्या वैशाखीच्या वारीप्रमाणेच वर्षभर नित्यनियमाने पूजाअर्चा चालू असायची. सकाळी उठून फुले, तुळशी आणणे, कोणाची भिक्षुकीची कामे करणे. मध्यांन्हापर्यंत जपजाप्य, पूजा अर्चा व वैश्वदेव उरकून अण्णा दोन घास पोटात ढकलीत. त्यानंतर पोथ्या लिहिण्याचा परिपाठ चालू असायचा. सायंकाळपूर्वी सीमेवर जाऊन पुन्हा शुचिर्भूत व्हायचं आणि संध्याकाळच्या पूजा धुपार्तीला सुरुवात व्हायची. रात्री घरी कोणती ना कोणती तरी पोथी चालू असायची. दगडाच्या दिव्यात घाणीचे तेल घालून लावलेल्या दिव्याच्या उजेडात गावाठाणातील मंडळी पोथी ऐकायची. "सजयति सिंधूवर्दनी देवो यत्पाद्पंकज स्मरणम" ने पोथी सुरु व्हायची. खडया आवाजात हरिविजय, भक्तिविजय, पांडव-प्रताप वगैरे पोथ्या सालामागून साले चालू असायच्या.

अण्णांना देवभक्तीशिवाय आता काहीच राहिले नव्हते. नरसिंह आराध्य दैवताची पूजाअर्चा, हेच सारे झाले होते. कोणावर संतापले तरी अण्णा "नरहरी - नरहरी" म्हणत मनाचे समाधान करीत. अण्णा देवमय होऊ लागले होते. दिनक्रमात जेवण सोडून अण्णांचं अण्णांकरीता काहीच राहिलं नव्हतं.

अण्णांच्या चेह-यावरच्या सुरकुत्या वाढू लागल्या. शब्द थरथर कापू लागले. हातातलं पळी - पंचपात्र आता लटपटू लागलं होतं. अण्णांचा ध्यास वाढतच होता. पूर्वी वैशाखीच्या वारीत आठ दिवस अगोदर निघणारे अण्णा आता पंधरा दिवस अगोदर बाहेर पडत. काकूंना तर रडू आवरनासे होई. अण्णांच्या दशम्या तयार करताना परातीत पडणारी आसवे लोकांनी पाहायची आणि सारे वातावरण गंभीर होऊन जायचे. अण्णांचे लक्ष गेल्यावार "आता काय, सारं नरहरी ! नरहरी !!" म्हणून अण्णांनी सा-यांना दिलासा द्यायचा.

ह्यावर्षी पाडव्याला पंचांग सांगण्याकरिता अण्णा कोणत्या वस्तीवर गेले नाहीत.
सा-या वस्त्यांना चावाडीसमोर एकदिवस बोलावालं व पाडव्याचं पंचांग सांगितलं. पंचांग संपल्यावर आर्त स्वराने अण्णा मनाशी पुटपुटले, "पुढचा पाडवा येईल का? ते सारे नरहरीलाच ठाऊक, असो नरहरी ! नरहरी !" ह्यावर्षी अण्णांनी वैशाखीच्या वारीला जाऊ नये, असे सा-या वस्त्यांचं म्हणणं होतं. काकू तर पाडव्यापासून सांगू लागल्या, "मी तुमच्या वरची जाऊन येते. देवाला तुमचा निरोप सांगते." परंतु हट्टी अण्णा ऐकेनात. पाडव्यापासून काकूंची व वस्त्यांची काळजी वाढू लागली. वैशाख पौर्णिमा तीन वार राहिली. अण्णांनी काकूंना धोतर उपरणी धुऊन ठेवायला सांगितली. रिठे भिजत घातले. सारे कपडे धुऊन तयार झाले. वरच्या वस्तीच्या रामभाऊंनी गाईचं दूध आज जादा आणलं होतं. काकूंनी दुधाच्या दशम्या केल्या. आजचा दिवस अण्णांनी वारीला निघण्याकरिता नक्की केला. मुक्काम पारगावात होता. दुपारच्या सावल्या खाली उतरू लागल्या. अण्णा निघणार होते म्हणून दोन - चार वस्तीतील माणसे एकत्र आली. अण्णांनी दशम्याचं आणि कपडयाचं गाठोडं पाठीशी घेतलं. देवघराकडे गेले, देवाला नमस्कार केला, काकूंकडे एकदा पाहिले. काकूंचं रडू त्यांना दिसत होतं. "नरहरी - नरहरी" म्हणत अण्णा निघाले. वरच्या वस्तीची माणसं वाळतीच्या शिवेपर्यंत अण्णां बरोबर गेली. चंपी कुत्रीही अण्णांना सोडीना. काकूंच्या सोबतीला कोणीच राहिलं नव्हतं. काकू वाटेकडे डोळे लावून बसल्या होत्या. अंधार केव्हां पडला तो त्यांना समजलाच नाही. अण्णा थरथर कापत अस्तमानाला पारगावात पोहोचले. पारगावच्या मंडळींनी त्यांचं दर्शन घेतलं. पुढे दररोज मजल - दरमजल काटीत अण्णा नरसिंगपूरच्या देऊळवाडयात पोहोचले. काकूंच्या दशम्या आता खारकेसारख्या झाल्या होत्या. पाण्यात भिजवून खाण्याशिवाय मार्गच राहिला नव्हता. भक्तमंडळींच्या सहवासात आज अण्णा रमत नव्हते. अण्णांना रात्रभर झोपही नव्हती. अण्णांचा सारखा ध्यास चालू होता, "नरसिंहा, आता शेवटचीच वारी. आता मी पुन्हा येणार नाही. आता मला परत कशाला पाठवितोस?" असे एक ना अनेक विचार मनात येत होते. मनाताल्या मनात नामस्मरणाच्या मण्यांच्या माळा पुढे सरकत होत्या. पहाटेच्या वेळेस अण्णांना स्वप्न पडल्याचा भास झाला. विजेचा लखलखाट व्हावा तसा. झोपले नव्हते तरी अण्णा दचकले. "अरे आता तू माझ्याकडे येऊ नकोस, मीच तुझ्याबरोबर येणार आहे." अण्णांच्या आराध्य देवतेने, ज्याच्या ध्यासाने सारी हयात घालविली त्या नरसिंहाने अण्णांना सांगितले. अण्णांना काहीच समजेना. अण्णांना पुन्हा सांगण्यात आले, "आता तू पुन्हा येऊ नकोस! तुझ्या गावी जा, ज्या ठिकाणी नदी पूर्ववाहिनी झाली असेल त्या ठिकाणी जळतीपेंढी पाण्यात दिसेल तेथे मी आहे, कायमचा तुझ्याचसाठी आहे!"

अण्णांची झोप पार उडून गेली. सारं अंग रोमांचित झालं. अंगातून बिजली निघून गेल्याचा भास झाला. अण्णांचं म्हातारपण गळून पडलं. वैशाख चतुर्दशीला अण्णांनी संगमात स्नान केलं. देवाचं दर्शन डोळे भरून घेतलं. अनेक वेळा दंडवत घालून अण्णा परतले.

अण्णा वारीला गेल्यापासून काकूंना काहीच करमत नव्हते. गावाताली मंडळी काकूंपाशी बसत, काकूंना दिलासा देत. गावातील थकलेल्या म्हाता-या, "अण्णा देवचं आणणार आहे काकू, अग अण्णांना देव इमानातून आणून सोडील, तुला कह्याला अण्णांची काळजी?" वरल्या वस्तीवरील रामभाऊ दूध घेऊन यायचा. बरोबर रताळातील अंबाडीही आणायचा. पण पहिलीच पडलेली भाजी पाहून रामभाऊने विचारले, "काकी, वाळून ठेवता काय भाजी?" काकू गहिवरून म्हणाल्या, "अरे रामा, हे वारीला गेल्यापासून घास घशाखाली जातच नाही. दूध थोडं थोडं घेते." रामभाऊंनी सा-या वस्तीला जाग केलं. लोकांनी काकूंना जेवायला आग्रह केला, परंतु काकू काही ऐकेनात. वैशाख चतुर्दशीला काकूंना स्वप्न पडलं. "तू आता उपास सोड, मी येतो." काकूंनी संध्याकाळी नरसिंहाचे स्मरण करून उपास सोडला.

आता अण्णा झपाट्याने गावाकडे येऊ लागले होते. वाटेत प्रत्येक ठिकाणी गावकरी जमून अण्णांचं दर्शन घेत. नवी जन्मलेली मुलं अण्णांच्या पायावर ठेवीत. थरथरत्या हातानी एखाद्या मुलाचा अण्णा गालगुच्या घ्यायचे.

अण्णा आपल्या वस्तीजवळ आले त्यावेळी सा-या वस्त्यांभोवती एक तेजोवलय अण्णांना दिसू लागले. अण्णांच्या उत्साहाला उधाण आलं. अण्णा गावच्या शिवेकडे येत आहेत हे समजताच सारी माणसं एकत्र जमू लागली. टाळकरी मंडळी, झांजपखवाजासहित शिवेपर्यंत गेली. इकडे काकूंना समजलं. काकूंचं सौभाग्य परत आलं. काकूंनी घर झाडून ठेवलं. चुलीपाशी रान शेण्या आणल्या. महिन्यातलं हलकेपण निघून गेलं.

अण्णा वस्तीवर आल्यावर नदीत हातपाय धुतले. गावक-यांना प्रसाद दिला. सर्वांना शांत रीतीने बसण्यास सांगितले. काकूही तिथे आल्या होत्या. हातात गुळपाणी घेऊन अण्णांनी सगळ्यांना सांगितलं, "मंडळी, उद्या सकाळी सूर्योदयाबरोबर मंगल स्नान करून दंडवत घालीत गावात यावं. टाळकरी मंडळींनी भजनाची तयारी करून यावं. आज मी आलो, उद्या देव आपल्या गावात येणार आहे." लोकांना काहीच कळेना. भाबडी मंडळी घरी गेली. अण्णांच्या लाख मोलाच्या शब्दांवर श्रद्घा ठेवून झोपी गेली. पहाट झाली. दिवस उजाडू लागला. सारं गाव केव्हाचं जागं झालं होतं. दळण, सडे, जनावारांचा शेणगोठा आवरून सारी वस्ती नदीकाळी लोटली. टाळक-यांनी देवाच्या नावाचा जयघोष सुरु केला. चिपळ्या, झांजा, पखवाज झाडू लागले. अण्णा साबरातून रस्ता काढीत काढीत नदीकिनारी चालू लागले आणि थबकले. त्याच ठिकाणी नदी पूर्ववाहिनी झाली होती. सकाळच्या शांत वातावरणात नदीच्या झुळझुळत्या शुभ्र पाण्यात पेंढी जळत होती. सारे गावकरी थबकले. कोणाला काहीच समजेना. नदीत बुडी मारून अण्णांनी महाराजांची स्वयंभू मूर्ती वर आणली. नदी किनारी ठेवून दिली. टाळक-यांच्या पखवाजांचा आवाज सा-या आसमंतात दुमदुमून गेला. "नरहरीमहाराज की जय" च्या जल्लोषाने सारा परिसर संपन्न झाला. पाच मळ्यात विभागलेली माणसे एकत्र आली, आनंदाच्या रांजणात विरघळून गेली. मीनेच्या काठी प्रत्यक्ष नरसिंहाचे आगमन झाले. अण्णांनी आयुष्यभर केलेल्या भक्तिभावाने, व्रतवैकल्याने भक्ताचा हट्ट महाराजांनी पुरा केला. नरसिंगपूरवासी महाराज मीनाकाठी येऊन राहिले. लखू अण्णांच्या जीवनाचे सार्थक झाले.

पुढच्या वैशाख वारीच्या आतच गावक-यांनी देऊळ पूर्ण केले. नरसिंगपूरची नरसिंह जयंती पाच वस्त्या एकत्र आलेल्या प्रेमाच्या भाविक - "रांजणीत" सुरू झाली. अण्णांच्या हस्ते नरसिंहाला लघुरूद्र होऊन वैशाख शु. ।। चतुर्दशीस सायंकाळी फुले उधळली. प्रत्येक भाविकास देवाच्या तेजस्वी विश्वव्यापक स्वरूपाचं दर्शन झालं. सारी मंडळी चैतन्यमय झाली.

दरसाल नरसिंह जयंतीस तेजस्वी दर्शनाने सारी भाविक मंडळी चैतन्यमय होऊन जात. लखू अण्णांसारख्या पुंडलिकाकरिता आलेल्या परब्रह्माच्या साक्षात्काराची अनुभूती घेतात.

३ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

श्रीहरी, रांजणीच्या श्री लक्ष्मी नॄसिंह मंदिरा बद्दलचा लेख छान आहे.
तसेच, नकाशासह माहिती असल्याने, भाविकांना तिथे जाणे सुलभ होईल.

Prakash Ghatpande म्हणाले...

रांजणी म्हणजे माझ्या वडिलांचे आजोळ. तात्यामामा ब्रह्मे मला आठवतात. आम्ही बेल्हयाहून बैलगाडीतून रांजणीला यायचो. बेल्ह्याला नदी नव्हती दोन ओढे होते. मला नदीचे खूप आकर्षण.रांजणीच्या मंदिराची जागृत देवस्थान ही किर्ती असल्याने भीती वाटायची.पारोसा गाभा-यात गेला कि डोळेच जातात. आज माझ्या वामनकाकांना रांजणी म्हणलं कि गल्बलून येते. नृसिंह जयंतीला ते पुण्याहून पण जायचे. मुकुंदमामांचा लेख वाचला आणी गतकाळातल्या स्मृतीला उजाळा मिळाला.

Prakash Ghatpande म्हणाले...

आत्ताच आईला संगणकावर मंदिराच्या गाभा-याचे दर्शन घडवून आणले. तिने भक्तिभावाने संगणकाला नमस्कार केला. जणुकाही ती मंदिरातच आली आहे.'चला बरं झालं दर्शन झालं ते' असं म्हणाली. म्हणाली अण्णा म्हणजे तुझ्या आजीचे वडील. मी आजी पण पाहिली नव्हती. ती गेल्यावर माझा जन्म झाला होता.